Anand Waghmare

आज माझ्या युनिट टेस्टचा रिझल्ट आहे. क्लासमध्ये बघायला या.नाहीतर मी बोलणार नाही”

आज माझ्या युनिट टेस्टचा रिझल्ट आहे. क्लासमध्ये बघायला या.नाहीतर मी बोलणार नाही”

ही गोड धमकी आठवतंच मी माझ्या मुलीच्या दुसरीच्या वर्गात शिरलो.

माझ्या आधीही काही पालक हौसेनं निकाल बघायला आलेले. बाबापेक्षा आईंची संख्या जास्त.

मी बावरतच वर्गात नजर फिरवली.मला पाहताच अनपेक्षित लाभ झाल्यासारखी ,मुलगी उठुन आनंदाने मला घेऊन टीचरकडे गेली न् म्हणाली, माय फादर. “.

मीही गुडमॉर्निंग म्हणालो.

टीचरनी एक कागद दिला व म्हणाल्या, हिच्या नावापुढे सही करा. ”

मुलीनं रोल नंबरवरुन नांव शोधलं. सही करताना लक्षात आलं की आधीच्या तिन्ही सह्या आईच्या होत्या. मनात विचार आला, खरेच एवढे बिझी आहोत का आपण ?.

विचारतच सही केली. टीचरनी एक्झाम पेपर्स माझ्याकडे दिले न म्हणाल्या, बसुन बघा सगळे पेपर “. असं म्हणुन टीचर बाकीच्या पालकांच्या शंका सोडवू लागल्या.

मी तिच्या बेंचवर कसातरी बसलो. बाजुला माझं बाळ.

अगोदर सगळ्या पेपरवरचे मार्क्स पाहिले. ४० पैकी ३५ , ३६. कुठे ३२.

टीचरजवळ १ मार्क गेला म्हणुन मुलांची काळजी करणा-यांची गर्दी बघुन , माझी मुलगी पहिल्या ५ मध्ये काय , १० मध्येही नसेल याची खात्री झाली.

मीही मग चुकलेले प्रश्नोत्तरे बघायला लागलो.

उत्तरे व्यवस्थित सुवाच्च सुटसुटीत लिहिलेली. चुकीचं उत्तरही छान लिहिलेलं.

मी तिच्याकडे पाहताच ती हसत जीभ चावायची.

तिने असं केलं की मी रागवू शकत नाही म्हणुन.

” बाबा , इथे माझी गडबड झाली म्हणून चुकलं”

” आता तुला याचं बरोबर उत्तर माहित आहे का ? ” – मी.

” हो. सगळी माहीत आहेत.”

” मग ठिक आहे. चुकुदे उत्तर. मार्क मिऴालेत समज”

“कसं काय ?”. ती गोंधळली.

” बरोबर उत्तरे विसरण्यापेक्षा चुकलेले प्रश्न लक्षात ठेवलेले बरे.”. मी उत्तरलो.

ती परत, का ?.

” कळेल नंतर “. मी

मीही भरभर पेपर बघितले व टीचरना परत दिले. धन्यवाद देऊन मुलीला घेऊन बाहेर पडलो.

तिला उचलून कडेवर घेऊन पाय-या उतरत होतो तेवढ्यात जिन्यात इंग्रजीत सुविचार दिसले. तिला ते वाचायला लावले. तिने ते वाचले पण अर्थ तिला कळाला नव्हता.

मग मी तिला ते सुविचार उदाहरणासहित समजावून दिले. पहिल्या मजल्यावर येईस्तोवर तिला एक सुविचार पाठही झाला.

अचानक काहितरी आठवल्यासारखं मुलीनं विचारलं , बाबा तुम्ही टीचरना काहीच का नाही विचारलं ?.

” काहीच म्हणजे ? “.

” म्हणजे की मार्क कमी का मिळाले, मी दंगा करते का ते ? घरी कधीकधी दमवते , टीव्ही बघत अभ्यास करते, अशी तक्रार पण नाही”

मला हसू आलं.

मी तिला हसतच विचारलं, ” तु शाळेत कचरा करतेस का ?”.

“नाही”. – ती.

” सगळ्या टीचरना रिस्पेक्ट देतेस”.

“हो “.

” तुज्याजवळ नेहमी एक इरेजर, शार्पनर, पेन्सिल एक्स्ट्रा असते. ते तु कुणाला लागला तर लगेच देतेस ?”.

” हो “.

” रोज एकाच बेंचवर न बसता सगळ्यांशी मैत्री करतेस?

” हो “.

” नेहमी खरं बोलतेस ? “.

परत ” हो “.

“लगेचच मनापासुन सॉरी आणि थॅंक्यु म्हणतेस ना ?

” हो बाबा हो ‘”. किती विचारताय हो.

” मग ठिक आहे बेटा. याबदल्यात थोडे मार्क गेले , अध्येमध्ये घरी दमवलं तर चालतंय मग.” मी म्हणालो.

का पण ?

“हेच तर शिकायचंय आता तुला ”

“आणि मार्कं , शिक्षण, पहिला नंबर ?.

” बेटा दुसरीचे मार्क दाखवुन जीवनात काही मिळणार नाही. आणि शिक्षण काय? कायम चालुच असतं. ”

सगळं तिच्या डोक्यावरुन गेलेलं. ती जरा उचकुनच म्हणाली,

” बाबा , मी मोठी झाल्यावर मला तुम्ही नक्की काय करणार आहे ?”.

तिच्या डोळ्यात बघुन मी म्हणालो, ” सुसंस्क्रृत”.

परत एकदा डोक्यावरुन गेलं. कळावं म्हणुन ती म्हणाली , त्यासाठी मी काय करायचं नक्की “.

मीही लगेच तिला धीर देत म्हणालो,

” फार काही नकोस करू. आता जशी आहेस तसं तु कायम रहा. “.

” मग ठिक आहे बाबा “. तिच्या जीवात जीव आला.

एक दोन पाय-या उतरल्यावर ती परत म्हणाली, ” बाबा, माझा रिझल्ट काय होता.

मी पाहिलाच नाही की ?”.

मी म्हणालो, ” रिझल्ट ?

तु दुसरी पास होणार “.

पास शब्द ऐकताच तिचा चेहरा आणखी खुलला. माझ्या खांद्यावर मान ठेऊन लाडीक स्वरात कानात म्हणाली ,

” म्हणजे बाबा, आजही तुम्ही मला एक बटरस्कॉच आईस्क्रिम देणार ना ?”.

मीही हसत तिला घट्ट छातीशी धरत Yes म्हणलं,
हीच खरी शिकवण कुठे तरी लोप होत चालली आहे, आणि चुकीच्या मार्गाने आपल्या मुलांचे मूल्यमापन करत आहोत।
जरूरी आहे, आपल्यात बदल करण्याचा….

Anand Waghmare

साहेब ! ….आता घरातल्या कुत्र्या-माजरांनाही उमेदवार्या द्या !!

साहेब ! ….आता घरातल्या कुत्र्या-माजरांनाही उमेदवार्या द्या !!: दत्तकुमार खंडागऴे* संपादक वज्रधारी

सध्या देशभर निवडणूकीचा मौसम सुरू आहे. सर्वत्र भांडवलदार व घराणेशाहीचाच वरचष्मा आहे. सर्व पक्षांचे उमेदवार एकतर भांडवलदार आहेत किंवा कुठल्यातरी नेत्याची मुलं, नातवंडे आहेत. आमदारकी, खासदारकी आता बर्यापैकी वारसा हक्काची प्रॉपर्टी झालीय.*

*🎯समाजानेही ती स्विकारलीय. लोकांनाही सामान्य चेहरे, सामाजिक काम करणार्या लोकांऐवजी या प्रस्थापित घरातलेच लोक योग्य वाटतात. या सगऴ्या भाऊगर्दीत जन-सामान्यांचा चेहरा हरवलाय. त्याचा तोंडावऴा असणारे उमेदवार आता राहिले नाहीत.

अलिकडे हातात भले मोठे सोन्याचे कडे, गऴ्यात बैलाला शोभेल अशी जाड साखऴी आणि प्रत्येक हातात अंगठ्यांची गर्दी. असे लोक आता राजकारणात येतायत. विविध पक्ष त्यांना उमेदवार्यांची खिरापत वाटतायत. यामागे एकच लॉजिक आहे ते म्हणजे जिंकण्याची क्षमता. म्हणजे निवडणूकीला उभे राहण्याचे निकष आज बदलले आहेत. तुमच्याकडे प्रचंड पैसा पाहिजे, तो उधऴायची तयारी पाहिजे. खर्च करण्याची क्षमता पाहिजे. पक्षाला, पक्षाच्या नेत्याला काही द्यायला पाहिजे. मग तुम्हाला उमेदवारी मिऴणार. बाकी तुमचे सामाजिक काम, चारित्र्य, अभ्यास, सृर्जनशिलता, रचनात्नक काम, मतदारसंघाच्या विकासासाठी काही संकल्पना, विविध प्रश्नांची जाण आणि ते सोडवण्याचे उपाय हे सगऴं गैरलागू झालय. यातलं काही नसलं तरी चालतय. उमेदवार येडचाप असला, चार-दोन खून केलेले असले, काही बलात्कार केलेले असले, नावावर केसेस असतील तरी काही बिघडत नाही. फक्त बक्कऴ पैसा जवऴ पाहिजे, नाहीतर बाप, आजोबा राजकारणी पाहिजे. इतक्या निकषावर तुम्ही राजकारण करू शकताय. लोकही निवडूण देतायत. ते ही विकासाच्या संकल्पना विचारत नाहीत, चारित्र्य तपासत नाहीत. अभ्यास किंवा सामाजिक काम केलय की नाही केलय काही पाहत नाहीत. उमेदवाराकडे संपत्तीचा झगमगाट असला की संपला विषय.

*🎯माध्यमंसुध्दा अशाच माणसाच्या मागे मागे पऴताना दिसतायत. त्यांच्याच उमेदवारीची चर्चा करताना दिसतायत. या सगऴ्या गदारोऴात लोकशाहीचा श्वास गुदमरतोय. सामान्य माणसाचा चेहरा आणि आत्मा राजकारणातून हरवला जातोय. पण खेदाची बाब ही की याचे भान सामान्य माणसालाच नाही. तो याच लोकांना भुललाय. त्यालाही या गोष्टींशी काही देणे-घेणे नाही. क्षमता असलेल्या व पात्रता असलेल्या वारसदारांनी स्वत:ला सिध्द करून जरूर राजकारणात यावे. त्याला विरोध करणे गैर आहे.

*🎯येणार्या काऴात कुणी सामान्य घरातला माणुस राजकारणात जावून आमदार, खासदार व्हायचे स्वप्नसुध्दा पाहणार नाही. घराणेशाहीची परंपरा इतकी अंगवऴणी पडलीय की नेत्यांनी घरातलं कुत्रे-मांजर जरी उभा केले तरी लोक निवडूण देतील. आत्ता नेत्यांची पोरं-नातवंडे राजकारणात येतायत. उमेदवार्या करतायत. त्यांची औकाद पाहिली, त्यांचे चारित्र्य पाहिले, कर्तृत्व पाहिले की तो दिवस लांब आहे असे वाटत नाही.

*🎯येणार्या काऴात एखाद्या साहेबाच्या, दादाच्या किंवा काकाच्या घरातले कुत्रे जरी निवडणूकीत उभा केले तरी लोक त्याला डोक्यावर घेतील. साहेबांनी, दादांनी, काका व भाऊंनी सांगितले की हे कुत्रेच तुमचा नेता. तुम्ही यालाच नेता माणा आणि निवडूण द्या. तरीही लोक निवडूण देतील. कुत्र्याची डिजीटल लागतील. त्याच्या आजू-बाजूला, खाली-वर लाचार कार्यकर्त्यांची फलटण आपले फोटो छापेल. आमचा नेता, आमचा आवाज, आमचा स्वाभिमान, बुलंद आवाज, ह्रदयसम्राट, उगवता सुर्य वगैरे वगैरे बिरूदं लावली जातील.
त्या कुत्र्यालाही मुजरे केले जातील. त्याच्या पाया पडले जाईल. कारण देशात गुलामांची आणि चमच्यांची पैदास मोठ्या प्रमाणात निर्माण झालीय. सर्व सामान्यांच्या मस्तकातला विवेक मेलाय का ? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. कॉग्रेसच्या घराणेशाही विरूध्द ओरडणार्या भाजपा-सेनेनेही शेवटी घराणेशाही आणि भांडवलशाहीलाच प्रस्थापित केलय. बाऴासाहेब ठाकरे हयातभर काँग्रेसच्या घराणेशाहीवर बोलले आणि जाता जाता ते ही मुलाला आणि नातवाला प्रस्थापित करून गेले. पुरोगामी म्हणून मिरवणार्या शरद पवारांनी घरातली चिल्लर मंडऴी पक्षात उतरवली आहे.

*🎯काँग्रेसनेतर यात कऴस केलाय. भाजपानेही घराणेशाहीच प्रस्थापित केलीय. त्यांच्या पक्षावर म्हणजे पक्षप्रमुख पदावर एका घराण्याचा पगडा नसला तरी तिथे एका जातीचा पगडा आहे. म्हणजे जातशाही अधिक घराणेशाही असे चित्र भाजपात आहे. त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तर संघाच्या सरसंचालक पदावर आजवर फक्त ब्राम्हण जातीचाच माणूस नेमला जातो. तिथे इतर जातीच्या लोकांना अजिबात स्थान नसते. संघाच्या स्थापनेपासूनचे सगऴे सर संघचालक हे फक्त ब्राम्हणच आहेत. भाजपा पक्षातही ब्राम्हणांचाच वरचष्मा आहे. म्हणजे सगऴे पक्ष जातीच्या आणि घराणेशाहीच्या दलदलीतली गटारं झाली आहेत. पार्थ पवार, आदित्य ठाकरे, भाजपातल्या प्रितम मुंडे, पुनम महाजन या नव्या नेत्यांची पात्रता पाहिली की या देशात लोकशाहीच्या उरावर घराणेशाहीच प्रस्थापित झाल्याचे दिसतय. इथून पुढच्या काऴात जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणण्याऐवजी जगातली सर्वात मोठी घराणेशाही किंवा भांडवलशाही म्हणायला काहीच हरकत नाही.

*🎯नेताजी सुभाषचंद्र बोस ज्यावेऴी आय सी एस करून भारतात परतले. परत आल्यावर ते महात्मा गांधींना भेटले आणि मला राजकारणात यायचे आहे. स्वातंत्र्यासाठी काम करायचे आहे असे सांगितले. महात्मा गांधींनी त्यावेऴी त्यांना “संबंध देश फिरून घे, देशाची माहिती घे, ओऴख करून घे मग राजकारणात ये !” असे सांगितले. त्यावेऴी अनेक नेते या पध्दतीने राजकारणात यायचे. आज काही संबंध नाही. देश लांबची गोष्ट. मतदारसंघाचा आडबुड माहित नसलेला, मतदारसंघाचे प्रश्न, त्याची उत्तर आणि त्या प्रश्न-उत्तरांशी काहीही देणे-घेणे नसलेला माणूस आमदार-खासदार होतोय. यासाठी आवश्यक आहे फक्त वारसा आणि पैसा. मग वारसा आणि वारसदार लायकीचे असोत-नसोत. पैसा कुठल्या मार्गाने कमावलाय, कसल्या मार्गाने कमावलाय. तो कमावताना कुणाच्या मुंड्या मुरगाऴल्या आहेत का ? कुणाची वाट लावली आहे का ? आपल्याच देशाची साधन-संपत्ती लुटून उभारलाय का ? याच्याशी काही देणे-घेणे नसते. दारूचा गुत्ता असो किंवा कुंटनखाना असो तुमच्याकडे फक्त पैसा असला म्हणजे झाले. या गोष्टी असतील तर राजकारणाचे दरवाजे उघडतील अन्यथा नाही. हे नसताना तुम्ही राजकारण करू शकता पण ते या लोकांचे गुलाम होवून. त्यांच्या सतरंज्या उचलण्याचे, जोडे उचलण्याचे काम राजकारण म्हणून करू शकता.*

*🎯हे करता करता कधीतर या भांडवलदार व सत्ताधिश मालकांनी एखाद्या फडतूस पदाचा तुकडा टाकलाच तर तो चघऴायचा फक्त, खायचाही नाही. पैसा आणि वारसा नसलेल्या नालायक लोकांना मतदानाचा अधिकार तरी कशाला ठेवलाय ? तो ही काढून घ्यावा.

*🎯डॉ.बाबासाहेबांनी उगाच या लोकांना मतदानाचा अधिकार दिला. मायबाप सरकार आणि भाडवलदार हो, सामान्य लोकांचा मताचा अधिकारही काढून घ्या.

Anand Waghmare, Uncategorized

“डेल्टा” चे आणखी एक घवघवीत यश, कु. नम्रता दाभाडे हिची नवोदय साठी निवड

डेल्टा युवा विकास संस्था,चाकण ची गुणवंत  विद्यार्थीनी कु.नम्रता दाभाडे हिची जवाहर नवोदय विद्यालय पुणे करिता येथे २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी  इयत्ता नववी करिता निवड झाली. लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच खेळ,पट्टीची वक्ता असणाऱ्या नम्रता ची निवड नवोदय करिता झाल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय तिने आई-वडिलांना दिले. त्याच प्रमाणे “डेल्टा” चे संचालक इंजि.आनंद  वाघमारे सर,  प्रा.हर्षदा भुजबळ  यांच्या अनमोल मार्गदर्शनानेच हे यश सहज मिळवल्याचे तिने विशेष नमूद केले.

namrata selection

Anand Waghmare

जिथे शिक्षकांचा सन्मान होत नाही तिथे समाजाची प्रगती खुंटते   आणि देशाची प्रगती थांबते .

उषा विलास जोशी यांचा
शिस्त आणि विद्यार्थी यावरील लेख फक्त शिक्षकांनाच दोष देऊ नका
विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते. काळानुसार या भूमिका बदलत जातात. भूमिका जशा शिक्षकांच्या बदलत जातात तशा पालकांच्या सुद्धा. ब-याच वेळा शिक्षक- पालक यांच्या नात्यावर विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते.*
५० वर्षांपूर्वी गुरुजी विद्यार्थ्यांवर मेहनत घ्यायचे. विद्यार्थ्यांना झोडपले,मारले तरी पालक शिक्षकांना काही बोलायचे नाहीत उलट विद्यार्थी आई – वडिलांना सांगायचे नाही की आज शाळेत मला शिक्षा झाली किंवा मला मारले कारण वडिलांचा अजून मार बसायचा. तुला शिक्षा झाली म्हणजे तू चुकलाच असेल ही धारणा पक्की होती. याचा परिणाम असा झाला होता की शिक्षकांबद्दल भीतीयुक्त आदर होता. शिक्षक हेच सुधारण्याचे प्रवेशद्वार यावर पालकांची श्रद्धा होती, त्या काळात शिक्षक ही तसेच होते . अशा शिक्षकांमुळे आपण सारे घडलो आयुष्यात येणाऱ्या समस्या या आपल्यालाच म्हणजे स्वतःला सोडवायच्या असतात. आपले आई-वडील शाळेत येऊन शिक्षकांशी बोलणार नाही, समस्या सोडवणार नाही. . यामुळे नियमबाह्य कामच करू नका. .चुकीचे गैरवर्तन करू नका. हे शिक्षकांच्या धाकामुळे शक्य झाले जे पुढे आयुष्यात नोकरी-व्यवसाय करताना खूप उपयोगी पडले.
शाळेतील नियम पाळल्यामुळे ऑफिसमध्ये वेळेवर जाण्याची सवय लागली.

आजकालचे पालक विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाक खुपसून शिक्षकांशी चर्चा (वाद) करायला येतात आणि ही चर्चा चालते त्या मुलांदेखत. जिथे मुलांच्या मनाला समजते की आई-वडील हे आपल्या प्रत्येक समस्या सोडवतील (समस्या या समस्या नसून बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे गैरवर्तन असते पण ते त्याला कधीच मान्य नसते.) आई-वडील आपल्या वर्तणुकीला सपोर्ट करता बघून त्यांचे सुधारण्याचे मार्ग हळूहळू कमी होत जातात. हे त्या मुलाला समजत नसते किंबहुना हे समजण्याचे वयच नसते पण पालकांना समजत असते मात्र आंधळया प्रेमापोटी ते समजण्याच्या मनस्थितीत नसतात.

50 वर्षांपूर्वीचे शिक्षक हे खरे गुरुजी होते. त्यानंतर गुरुजी हळूहळू कमी होत त्यांच्यातले उरलें कडक शिक्षक. .
या कडक शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचा परिणाम अतिसंवेदनशील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होऊ लागला.
1990 नंतरच्या म्हणजेच पंचवीस तीस वर्षांपूर्वीचे शिक्षक होते त्यांच्याकडून अति कडक शिस्त आणि शिक्षा यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान काही प्रमाणात सुरू झाले.
याच दरम्यान ग्लोबलायझेशन नुकतेच आले होते. पालकांची मानसिकता बदलत होती.. भौतिकवादाकडे आपण चालायला सुरुवात झाली आणि अतिमहत्त्वकांक्षा, हव्यास अशी चुकीची मूल्ये समाजात रुजायला लागली.
*पास-नापास यांचा गंभीर प्रश्न समाजासमोर यायला लागला.* नैराश्यातून दहावीच्या विद्यार्थ्यांचे आत्महत्या प्रमाण वाढले. “शालेय परीक्षेत नापास म्हणजे आयुष्यात नापास”, या एका विचारामुळे विद्यार्थ्यांंमध्ये नैराश्य वाढत गेले.
याच दरम्यान शिक्षणाचा कायदा आला. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा करणे हा गुन्हा ठरवला. आठवीपर्यंत नापास करता येणार नाही अशा तरतुदी आल्या यामुळे कडक शिक्षकांच्या मानसिकतेमध्ये हळूहळू बदल झाला. बरेच शिक्षक रिटायरमेंट स्टेजलाच होते. 2001 नंतर शिक्षकांची नवी तरुण पिढी यायला लागली. पण या दरम्यान पालकांच्या मानसिकतेमध्ये फार बदल झाला होता. येत्या दहा वर्षांमध्ये भौतिकवाद समाजात प्रचंड रुजला. *जिंकणे हेच सर्वस्व मग भले ते कुठल्याही मार्गाने मिळो हा संस्कार पालकांमध्ये घट्ट रुजला* आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर झाला. पालकांमध्ये आपल्या मुलाबद्दल अति महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्या. एकुलते एक बाळ. . त्याला हव्या त्या गोष्टी पुरवणे. . त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करणे.. हे पालकांचे आद्य कर्तव्य झाले. याच दरम्यान पालक आणि विद्यार्थी सोशल मीडिया, मोबाईल, टीव्ही या सर्व गोष्टीत अडकले. मैदानी खेळ नाही, अति स्क्रीन टाइम यातून मुलं हट्टी बनत गेली. मागितले तर मिळते हा संस्कार अधिक रुजला. चंगळवादामुळे पालकांमध्ये मूल्य-संस्कार याचे महत्व कमी झाले. *याचा महत्त्वाचा परिणाम शिक्षकांबद्दलचा सन्मान कमी झाला. *प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेतली जाते अशा खोट्या समजुतीमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान व्हायला सुरुवात झाली.* अति लाडा मुळे म्हणा किंवा अतिमहत्त्वाकांक्षी पणामुळे म्हणा किंवा शिक्षण कायद्याचा गैरवापर म्हणा पालक छोट्या-छोट्या कारणांसाठी शिक्षकांशी वाद घालू लागले.

आईने मुलाच्या संपूर्ण अभ्यासाची जबाबदारी स्वीकारली. १०० पैकी १०० मार्कांसाठी मुलांच्या अभ्यासाच्या चुकांपासून शिक्षकांच्या चुका काढण्यापर्यंत सर्व ती करू लागली. *पालकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर फक्त शिक्षक कसे चुकीचे होते आणि माझी मुलगी/ मुलगा कसा योग्य आहे आणि तो/ती कधीच खोटे बोलत नाही यावरच चर्चा रंगू लागल्या.* येत्या १० वर्षातील शिक्षकांना वर्गामध्ये क्लास कंट्रोल करणे कठीण होऊ लागले. ADHD, Learning Disabilities, Lack of Concentration यासारख्या समस्यांचे प्रमाण वाढले. वर्गातील दोन-तीन टग्या मुलांमुळे अख्खा वर्ग डिस्टर्ब होऊ लागला. *त्यात हायपरऍक्‍टिव्ह मुलांच्या समस्या वेगळ्याच होत्या. त्या हाताळायच्या कशा हा शिक्षकांसमोर प्रश्न पडला.*

शिक्षण कायद्याच्या गैरवापरामुळे विद्यार्थ्यांना मारणे सोडा साधे रागावणे कठीण होऊन बसले. शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यावी तर काय द्यावी हा प्रश्न पडला. वर्गाच्या बाहेर काढले तर पालक भांडायला येतात की तो/ती वर्गाच्या बाहेर राहिल्याने तिचे शैक्षणिक नुकसान झाले. वर्गात उभे केले तर पालक ओरडतात की त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला, आता तो शाळेत यायला नाही म्हणतो.
कान पकडून उठाबशा काढायला सांगितले तर पालक दुसऱ्या दिवशी मेडिकल सर्टिफिकेट घेऊन येतात.
खूप त्रास देतो म्हणून कुठल्या ऍक्टिव्हिटी मधून काढून टाकले तर लगेच पालक म्हणतात आम्ही फी भरली आहे त्याला ॲक्टिव्हिटीमध्ये घ्या. तशी स्कूल डायरी मध्ये नोट्स येते. टीचरने त्याच्याशी बोलणे सोडले तर पालक लगेच म्हणतात पाहू टीचर किती दिवस बोलत नाही तुझ्याशी. . तू स्वतःहून बोलू नकोस. . प्रिन्सिपल ला सांगून तिला तुझ्याशी बोलायला मी भागच पाडते.. अशी कशी टीचर बोलत नाही पाहू.

म्हणजे मुलांना शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यायचीच नाही पण शिस्तीची अपेक्षा शाळेकडून नेहमी ठेवायची. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळत असेल तर त्याबरोबर कर्तव्य सुद्धा पूर्ण करायचे असतात, जबाबदारीसुद्धा पाळायची असते याचा संस्कारच आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजत नाही.* शिक्षक हे सुधारण्याचे प्रवेशद्वार असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेम आणि स्वातंत्र्य देऊन त्यांची मनं जिंकायची असतात पण हे करण्याच्या प्रक्रियेमध्ये शिस्त लावण्यासाठी काही अधिकार शिक्षकांना सुद्धा लागतात. मारणे, जबर शिक्षा करणे हे अघोरीच आहे ते केव्हाच कालबाह्य झाले आहे आणि आजकालचे शिक्षक याचे समर्थनपण करणार नाहीत पण सध्याच्या काळात साधे रागावणे, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी छोट्या-छोट्या शिक्षा करणे सुद्धा पालकांच्या दबावापोटी बंद झाले आहे. याचा विद्यार्थ्यांवर दूरगामी खूप वाईट परिणाम होतो. *विद्यार्थ्यांना अपमान पचवण्याचे मानसिक धैर्य राहत नाही.* असे विद्यार्थी तरुणपणी लवकरच नैराश्याच्या विहिरीत पडतात. मला कोणी रागवत असेल तर ते माझ्या फायद्यासाठी आहे. . कुणीही शिक्षक आनंदासाठी, काट काढण्यासाठी, दुसऱ्याचा राग विद्यार्थ्यांवर काढण्यासाठी विद्यार्थ्याला रागवत नसतात . ते रागवतात याचा सरळ अर्थ विद्यार्थी कुठेतरी चुकतो आहे पण विद्यार्थ्यांची धारणा होऊन जाते की मला कोणीही रागवू नये ओरडू नये. या धारणेने विद्यार्थी मोठा होतो आणि मग पुढे आयुष्यात वावरताना नोकरी करताना व्यवसायामध्ये, समाजात लोकांशी वागतांना जड जाते. कारण जग आपल्या म्हणण्यानुसार नाही चालत. आयुष्यात मान-अपमान हे दोन्ही येत राहते. मारणं हे अयोग्यच त्याला मी काय कोणीही समर्थन करणार नाही पण वर्गात रागावणं सुद्धा आजकाल बंद झाले आहे त्यामुळे अपमान कसा सहन करावा आणि त्यातून self analysis कसे करावे ही प्रक्रियाच मुलांच्या मनांत होत नाही. जी सर्वंगीण विकासासाठी आवश्यक आहे.

काही झाले की पालक शिक्षकांशी चर्चा करायला येतात ज्यामध्ये चर्चेचा सूर कमी आणि कोर्टात जसे आरोपीला प्रश्न विचारतात तसेच पालक शिक्षकांना विचारतात. या सर्व संवादामुळे मुलांच्या मनात शिक्षकांविषयीचा आदर निघून जातो आणि विद्यार्थी हेच शिकतो की मला काही अडचण आली तर आहे माझी आई. त्याच्या प्रत्येक (चुकीच्या) निर्णयांमध्ये आई सहभागी होते. ती स्वतः निर्णय घेते. . ती इतकी involve होते की त्याचा अपूर्ण राहिलेला होमवर्क, प्रोजेक्ट, अभ्यास ती स्वतः पूर्ण करते. पाल्य दुसऱ्यांवर अवलंबून राहायला शिकतो. स्वावलंबनाचे धडे लहानपणी द्यायचे असतात ते ती विसरून जाते. ही मुलं मोठी झाली आणि घरात आग लागली तरी फायर ब्रिगेडला फोन करायचा असतो हे सुद्धा त्यांना लवकर सुचत नाही एवढे ठोम्बे बनतात कारण लहानपणापासून मुलांसाठी आपण Ready made answer देत होतो.

जिथे पालक शिक्षकांशी उद्धटपणे वागतात तिथे विद्यार्थ्यांची प्रगती खुंटते. मानसशास्त्राचा नियम आहे. . जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर असतो, श्रद्धा असते तेव्हा शिक्षक जेव्हा वर्गात शिकवतात तेव्हा अंतर्मनाची द्वारे आपोआप उघडली जातात आणि शिक्षक जे शिकवतात ते लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा पालक विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या वर्ग शिक्षकांशी उद्धटपणे बोलतात किंवा सातत्याने भेटून तक्रारीचा पाढाच गात राहतात तिथे पाल्याच्या मनातील शिक्षकांबद्दलचा आदर कमी होत जातो आणि त्याचे शैक्षणिक समस्याचे प्रमाण वाढत जाते.

काही पालक खास करून आया आपल्या बद्दल नेहमी असमाधानी असतात. पालकत्वाची A B C D सुद्धा माहित नसलेल्या या आया शिक्षकांसमोर माझं मूल कसं मूर्ख आहे, त्याला कसं कळत नाही आणि या सर्वाला एकमेव टिचरस कसे जबाबदार आहे हे मोठ मोठ्या आवाजात दहा पालकांसमोर बडबडत असतात. *अशा पालकांच्या पाल्याचे भविष्याबद्दल खरच चिंता वाटते कारण असे पालक समजून घेण्याच्या पलीकडचे असतात.* काही पालक तर मुख्याध्यापकांकडे हट्ट धरतात की शिक्षकांना बोलवा आणि माफी मागायला लावा. यातून टीचेर्सचे मनोधैर्य कमी होते. ते शाळेतील एक्स्ट्रा कामे करायला कंटाळा करतात. शिक्षकांकडून उत्तम कामाची अपेक्षा असेल तर त्याचे कौतुक होणेही गरजेचे असते खास करून ज्या शाळा फक्त अभ्यास शिकवण्याचे कार्य करत नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची धडपड करत असतात आणि त्यासाठी सातत्याने नवनवीन अॅक्टिविटीचे आयोजन करत असतात. अशा ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी मुख्याध्यापकांना उत्तम नियोजनाबरोबर शिक्षकांचे सहकार्य अपेक्षित असते. हे सहकार्य हळूहळू कमी होते.

*या काही कुरकुरे पालकांमुळे शिक्षकांचा उत्साह कमी होतो.* प्रत्येक शाळेत असे कुरकुरे पालक असतात त्याचे प्रमाण दहा टक्के पण नसते पण त्यांच्या चुकीच्या संवादामुळे, चुकीच्या पालकत्वामुळे, चुकीच्या अपेक्षेमुळे शाळा व्यवस्थापनाशी वाद होतात. 90% पालक हे शाळेबद्दल नेहमी आनंदी असतात पण ते बघ्याची भूमिका घेतात. शिक्षकांना कौतुक करण्यात ते कंजुषी करतात आणि मग हे 10% पालक अतिशय उद्धटपणे विषय हाताळतात. सोशल मीडिया, वृत्तपत्र यांना चुकीच्या माहिती देऊन बातम्या प्रसिद्ध करतात. व्यक्ती/संस्था जेवढी मोठी तेवढ्या तिखट-मीठ लावून बातम्या रंगवल्या जातात.. या सर्वांची सुरुवात झालेली असते ती म्हणजे अतिमहत्त्वाकांक्षा अति अपेक्षा चुकीच्या पालकत्वाच्या या बीजातून.

कालच बातमी वाचली नाशिकमध्ये एक पाचवीचा विद्यार्थी दोन दिवस शाळेत आला नाही म्हणून शिक्षकाने आईला फोन करून सांगितले. आई म्हणे तो रोज शाळेत जातोय. आईने मुलाला विचारले, तेव्हा तो कबूल झाला मी शाळेत जातो सांगून घरातून निघतो पण शाळेत जातचं नाही. तो वाईट मुलांच्या संगतीत लागला होता. म्हणून आईने त्याला दोन फटके दिले. आईने मारले याचा राग आला म्हणून त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आता या घटनेला कोण जबाबदार? शिक्षक.. ज्याने काळजीपोटी मुलगा शाळेत येत नाही म्हणून फोन केला का आईने त्याला पहिल्यांदाच मारले का तो स्वतः विद्यार्थी ज्याला राग सहन होत नव्हता. आईने आधीपासूनच शिस्तीला महत्त्व दिले असते, चुकले की रागवले असते, शाळेचे नियम हे भविष्य चांगले करण्यासाठीच असतात हे जर पहिलीपासून मनावर बिंबवले असते तर आज ही वेळ कदाचित आली नसती.

पालकांनो शिस्त ही प्रेमाची पहिली पायरी आहे.शिक्षकांना त्यांची कामे करू द्या. शाळेचे छोटे छोटे नियम पाळावेच लागतात कारण त्यातून मोठेपणी भारतातील कायदे पाळण्याचे संस्कार रुजत असतात.शाळेत थोड्या उशिरा पोहोचल्याने त्यांच्यामध्ये वेळेचे व्यवस्थापनाचे महत्व कमी होते याचे साधे ज्ञानसुद्धा आजकाल पालकांना नसते. आजकालची मुलं अति लाडा पोटी बिघडत चालली आहे त्यांना कोणाचीच भीती उरली नाही. त्यांची वाढ अशीच झाली तर पुढे ते आई-वडिलांची झोप उडवू शकतात म्हणून शाळा शिक्षक आणि पालक यांच्यात मैत्रीपूर्ण वातावरण असणे गरजेचे आहे. शाळेत होणाऱ्या ओपन हाऊस, पालकांच्या मिटींगला शिक्षकांशी सन्मानांनी बोलणे, त्यांना समजून घेणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. एकमेकांना आदर आणि सन्मान जर राहिला तर त्या विद्यार्थ्यांना योग्य रुळावर आणणे सोपे जाईल.

जिथे शिक्षकांचा सन्मान होत नाही तिथे समाजाची प्रगती खुंटते आणि देशाची प्रगती थांबते .

Anand Waghmare

अलार्म बंद केल्यानंतर जी पुन्हा डुलकी लागले ती खरी झोप

अलार्म बंद केल्यानंतर जी पुन्हा डुलकी लागले ती खरी झोप….!!
महिनाअखेर अचानक साडीच्या घडीतून मिळालेले पैसे म्हणजे खरा धनलाभ…..!!
कडकडून भूक लागली असता मस्त जमून आलेली पिठलं भाताची पंगत म्हणजे खरी मेजवानी….!!!
कोणत्याही गोष्टीचे अप्रुप असतांना अलगद ओंजळीत पडलेली ती गोष्ट म्हणजे खरे सुदैव….!!!
आपल्याला काय मिळाले यापेक्षा आपल्याला खूप काही मिळाले ह्याची जाणीव म्हणजे खरी तृप्ती….!!!
रात्री गादीवर पाठ टेकताच लागलेला डोळा म्हणजे खरे सुख….!!
Be positive…!!!
ह्या जगण्यावर,ह्या जन्मावर शतदा प्रेम करावे….!!!…!!!

Anand Waghmare

दान केल्यानं पुण्य लागतं. जमेल तितका दानधर्म करावा. आणि विशेषतः एखाद्या…..

दान केल्यानं पुण्य लागतं. जमेल तितका दानधर्म करावा. आणि विशेषतः एखाद्या गरीब भिकारणीला पैसे देऊन तिच्या मुलाच्या दुधाची सोय करावी.

चुक! अतिशय चूक !

स्थळ : दाभोळकर कॉर्नर सिग्नल, कोल्हापूर

वेळ :- दुपारी २

वैशाखातली रणरणती दुपार ! ऊन मी म्हणत होतं. उन्हाकडे उघड्या डोळ्यांनी बघवत नव्हतं. वैतागून गेलेले लोक उगाचच एकमेकांवर खेकसत होते. डांबरी रस्त्यावरून उठणाऱ्या पारदर्शक झळा जीवाची तगमग वाढवत होत्या.

भिकारी !

सिग्नल वर त्यांचा कसा अपवाद असणार ? लंगडे, लुळे, धडधाकट यांच्यासोबत रडणारी लहान मुलं काखोटीला मारून लोकांच्या सहानुभूतीचा गैरफायदा घेणाऱ्या भिकारणी सुद्धा मागे नव्हत्या. अशीच एक भिकारीण एक कळवळून रडणारं मूल घेऊन जमेल तितक्या लोकांना आर्जवं करत होती.

विषय नेहमीचाच. मुलाच्या दुधासाठी पैसे हवेत.

माझ्या शेजारीच उभ्या असलेल्या एका कारमधून एक स्त्री उतरली आणि भिकारणीशी बोलायला लागली. अगदी जवळ असल्यानं मला त्यांचं संभाषण ऐकू येत होतं. तिनं एक शंभरची नोट काढली आणि देऊ केली पण त्या बदल्यात तिनं थोड्या वेळासाठी रडणाऱ्या बाळाची मागणी केली. भिकारणीने आनंदाने तिची मागणी स्वीकारली.

कसं कोण जाणे पण त्या स्त्री ला कळलं होतं कि बाळ भुकेनं रडत नाहीये (स्त्रियांना याची दैवदत्त देणगी असते).

त्या रडणाऱ्या साधारण एक वर्षाच्या मुलाचे कपडे तिनं दूर केले आणि एक जळजळीत सत्य समोर आलं.

लहान बाळाच्या मांड्यांवर आणि पोटावर चिमटे लावले होते.

यासाठीच ती भिकारडी वारंवार त्याच्या अंगावरून हात फिरवत होती जेणेकरून त्याच्या वेदना वाढाव्यात. ते रडल्याशिवाय लोक पैसे कसे देणार ?

पण लोकांना वाटावं कि किती माया आहे पोरावर तिची !

पैशासाठी माणूस इतका क्रुर होऊ शकतो ?

पाहणारे आजूबाजूचे लोक प्रचंड खवळले होते. थोड्याच वेळात भिकारणीचा चेहरा ओळखण्यापलीकडे गेला. पोलीस पोचेपर्यंत तिला प्रचंड मारहाण केली गेली.

काही दिवसांनी आलेल्या वर्तमानपत्रातील बातमीनुसार. हैदराबाद येथून पळवण्यात आलेलं ते बाळ आपल्या आई वडिलांकडे सुखरूप परत गेलं. त्याच्या आईनं त्या स्त्री चे अश्रूंनी पाय भिजवले होते. आनंदाश्रु अर्थात !

पोलिसांचीही कमाल कि त्यांनी त्या बाळाचे पालक शोधून काढले.

पण त्या स्त्रीच्या धैर्याला माझा सलाम !

माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती !

दानाच्या उद्देशानं जेव्हा तुम्ही कधी आपलं पाकीट उघडाल तेव्हा एक खात्री असूद्यात कि दान सत्पात्री झालं पाहिजे, न जाणे आपलं दान अजून एखाद्या लेकराचं आयुष्य उध्वस्त करायचं!

तेव्हा मग समाज सांगतो कि दान करणं चांगलं, पण त्यात “सत्पात्री” हा उल्लेख व्हायला हवा.

वाचल्याबद्दल धन्यवाद ! 🙋‍♀

Anand Waghmare, असंच काही वाचण्यासारख

भाड्याची सायकल

1981/82 चा काळ होता तो , त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो. बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्या मुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. भाडे जेमतेम 50 पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं. दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा. घराच्या जवळ प्यारेलाल, जाधव , सुवर्णा असे अनेकजण सायकल दुकानदार होते

भाड्याचे नियम कडक असायचे. जस पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी. मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो, पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत, कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवचो. आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र पाळीपाळीने सायकल चालवायला मागायचे. भाड्याच्या टाईमाचा लिमिट न निघुन जावा म्हणून तिन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची.
तेव्हा भाड्याने सायकल घेणं हे आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं. स्वतः ची लहान सायकल असणारे त्यावेळेस खुप रईसी झाडायचे.
एव्हाना आमच्या घरी तेव्हा मोठी काळी अँटलस सायकल आणली, पण तीला स्टँवरुन काढणं आणी लावणं यातचं अर्धी एनर्जी वाया जायची, आणी वरुन वडिलधाऱ्या चा धाक. खबरदार हात लाऊ नको सायकलला, गुडगे फुटुन येशील. तरी पण न जुमानता आम्ही घरचे बाहेर गेले की , ति मोठी सायकल सुध्दा हातात घेउन धुम ठोकायचो. पायडल वर पाय ठेऊन बँलेंस कराचं.

असं करत करत आम्ही कैची ( हाफींग ) शिकलो. नंतर नळी पार (फुल पायंडल ) करुन नविन विक्रम घडवला. यानंतर सिट पर्यंत चा प्रवास एक नवीन अध्याय होता , नंतर सिंगल, डबल, हात सोडुन, कँरीअर वर बसुन चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करुन चुकलो.

खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालु आहे पण आता ते दिवस नाही, तो आनंद नाही. आज सहज कंपाउंड मध्ये धुळ खात पडलेल्या मुलांच्या सायकल वर नजर गेली तेव्हा वाटलं एक काळ गाजवलेल्या सायकल ची कींमत अन् मजा यांची सर आता असलेल्या बुलेट ला पण येणार नाही